। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) निवासी शिबीर नुकतेच रामराज विभागातील खैरवाडी येथे पार पडले. या शिबिराचा उद्घाटन सोहळा संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
यावेळी माजी पंचायत समिति सदस्य सुभाष वागळे, अशोक खोत, यशवंत भगत, रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ, माजी उपसरपंच जयेश ढेबे, माजी सदस्य धर्मेश गडखळ, बोरघरचे माजी सरपंच मधु ढेबे, बाळू पाटील तसेच कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्राचार्य रविंद्र पाटील, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या सात दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन निसर्गाच्या कुशीत शहरी भागापासून दूर ग्रामिण भागात करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी खैरवाडीतील प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच क्रीडांगण स्वच्छता अभियान राबवले. तसेच, शून्य कचरा व्यवस्थापन कार्यशाळा, एचआयव्ही जनजागृती तसेच प्राध्यापिका आणि विद्यार्थीनिंनी महिलांकरिता मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविण्यात आले. तसेच, श्रमदानातून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ अंतर्गत खैरवाडी येथे 15 फूट रुंद व 2 फूट उंच बंधारा बांधण्यात आला. या निवासी शिबिरामध्ये श्रमदान व विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजवण्याचे कार्य पटवून देण्यात आले.
शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पाटील तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश पाटील, प्रा. प्रियांका पाटील व इतर शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.