पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने जिल्ह्यात तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय तालुकास्तरीय २०२२-२०२३ च्या १७ वर्षाखालील वयोगट आणि १९ वर्षाखालील वयोगट व्हॉलीबॉल स्पर्धेत पीएनपी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जे. एस. एम. कॉलेज अलिबागच्या प्रांगणात शालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील संघांनी सहभाग घेतला होता.  

१७ वर्षाखालील वयोगटाचा अंतिम सामना पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी आणि सेंटमेरी स्कूल अलिबाग यांच्यात रंगला. अटीतटीच्या लढतीत सेंटमेरी स्कूल अलिबाग प्रथम तर पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी द्वितीय क्रमांकाने विजेता ठरला. तर १९ वर्षाखालील वयोगटाचा अंतिम सामना पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी आणि आर,सी.एफ. स्कूल कुरुळ यांच्यात झाला. यामध्ये आर,सी.एफ. स्कूल संघ विजेता ठरला, तर पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय वेश्वीने द्वितीय क्रमांक पटकावला.

क्रीडा स्पर्धेतील त्यांच्या या यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्राचार्य संजय मिर्जी, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. निशिकांत कोळसे, प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. 

Exit mobile version