आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्यगृहाचे भूमिपूजन; चित्रलेखा पाटील यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पीएनपी नाट्यगृह भीषण आगीत भस्मसात झाल्यानंतर हताश झालेल्या नाटयरसिकांसाठी पुन्हा एकदा या नाट्यगृहाच्या उभारणीचा संकल्प सोडण्यात आला असल्याने उभारी मिळाली आहे. नाट्यगृहाच्या वर्धापनदिनीच शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जुलै रोजी नाट्यगृहाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभाकर पाटील कला सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी दिली आहे. प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धपत्रकात चित्रलेखा पाटील यांनी संवाद साधताना म्हटले आहे की, कलाकारांच्या सांस्कृतिक विकासासाठी पीएनपी नाट्यगृहाची स्थापना करण्यात आली होती. त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून अनेक कलाकार सांस्कृतिक आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित झाले. काही दुर्दैवी कारणामुळे नाट्यगृह भस्मसात झाले. कलाकारांची आणि रसिकांची स्वप्ने भस्मसात झाली. पण अशा अपघाताने हिम्मत ढासळेल तो कलाकार कुठला? कलाकार फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेणारा असतो. त्याचप्रमाणे राखेतून झेप घेऊन पुन्हा नव्याने नाट्यगृहाची वीट रचण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या वेळेला तुम्हा प्रत्येक कलाकाराचा सहभाग आणि श्रमदानाची अपेक्षा करीत आहोत. ७ जुलैला दुपारी १२ वाजता नाट्यगृहाच्या वर्धापनदिनीच आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा नाट्यगृह उभारण्याचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाकरिता असे, सांगत कलाकार तसेच रसिक म्हणून सर्व नागरिक बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभाकर पाटील कला सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.