पीएनपीचा पदवीदान समारंभ उत्साहात

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान, बी.एड. महाविद्यालयातर्फे पीएनपी नाट्यगृहात पदवीप्रदान सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रेश्मा सुदाम (पोलीस नाईक, पोलीस नियंत्रण कक्ष), पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, बी.एड. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य नितेश मोरे, परीक्षा समन्वयक प्रा. बसवराज बोरकडे, प्रा. नम्रता पाटील, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. ऋतुषा पाटील, मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, विविध विभागांचे विभागप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्या स्नातकांनी पदवी परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करून गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले, त्यांना पोलीस बँडच्या मिरवणुकीसह पदवीप्रदान सभागृहामध्ये सन्मानाने सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. त्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाची पूर्वपीठिका विशद करून पदवी प्रदान समारंभाच्या उज्ज्वल यशाची परंपरा आपल्या भाषणामधून व्यक्त केली. यानंतर पदवी वितरणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठात रायगड जिल्ह्यातून पीएनपीच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, यामध्ये मायक्रोबायोलोजीमध्ये मिताली विश्‍वास नाईक, शुभम बाळकृष्ण पाटील यांना ओ ग्रेड, मॅथेमेटिक्समध्ये प्रणित प्रवीण चव्हाण यांना ओ ग्रेड, तर बॉटनीमध्ये हर्षदा दिलीप चेरफळे हिला ओ ग्रेड मिळाली आहे.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रेश्मा सुदाम डफळ यांनी विद्यार्थ्यांना स्वप्नपूर्ततेबाबत मार्गदर्शन केले. जे आहे त्यात समाधान न मानता पुढे गेले पाहिजे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असेल; पण तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न कसे असावे, याबद्दल मार्गदर्शन केले व भविष्यातील करिअरविषयी संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रांत वार्डे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बी.एड. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य नितेश मोरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version