टीम इंडियाच्या पराभवानंतरचे कवित्व

चोहोबाजूने टीकेचा भडिमार,संघाच्या कामगिरीवर नाराजी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दुबई येथे सुरु असलेल्या टी -20 विश्‍वचषक स्पर्धेतील टीम इंडियाच्या सुमार कामगिरीवरुन क्रिकेट जगतातून नाराजीचा सूर उमटू लागला असून, संघाच्या एकूणच सुमार कामगिरीवर भारताच्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. संघातील खेळाडूंना देशापेक्षा आयपीएल महत्वाचे असल्याची खरमरीत टीका ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांनी केली आहे.

खेळाडूंनी देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य दिले

संघातील काही क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग खेळणे पसंत करतात आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याला महत्त्व देत नाहीत, असे मोठे विधान केले आणि बीसीसीआयने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. क्रिकेटपटूंनी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याच्या कल्पनेच्या विरोधात नाही, पण क्रम उलट असावा,अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

आता भविष्यातील सामन्यांकडे पाहण्याची वेळ आली आहे. तुम्ही ताबडतोब नियोजन सुरू केले पाहिजे. विश्‍वचषक संपल्यापासून भारतीय संघाचे संपूर्ण क्रिकेट संपले आहे असे नाही. जा आणि योजना करा मला वाटतं आयपीएल आणि वर्ल्ड कपमध्ये काही अंतर असायला हवे होते. पण हे निश्‍चित आहे की आज आमच्या खेळाडूंकडे भरपूर एक्सपोजर आहे पण ते त्याचा पुरेपूर उपयोग करू शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना दिली.

Exit mobile version