पूल भुईसपाट करताना पोकलेन कोसळली

सा.बां.विभागाचा हलगर्जीपणा

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील माटवण येथील जुना पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याच्या कामामध्ये महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाची चर्चा सर्वत्र होत आहे. माटवण येथील जुना पूल भुईसपाट करताना पोकलेनच पुलाखाली कोसळल्याने ठेकेदारांच्या हवाली या पुलाचे पाडकाम सोपवून अभियंते आपल्या केबिनमध्ये आराम घेत बसल्याची टीका आता सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.

पोलादपूर तालुक्यातील भोराव माटवण सवाद धारवली कालवली ते निगडे या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू झाले आहे. या कामाचे स्वरूप हे वरंध घाटाला पर्यायी रस्ता असे असून, कालवलीनंतर वनविभागाच्या जमिनीतून नवीन विस्तारित रस्ता होणार असल्याचे स्पष्ट झाले. पावसाळ्यामध्ये जुन्या पुलाजवळच पूरस्थिती निर्माण होऊन माटवण गावामध्ये दोन नवीन पुलांचे काम मंजूर झाले. या पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यासाठी पाडकाम सुरू करण्यात आले. यावेळी कोणत्याही प्रकारचे अभियंत्यांचे मार्गदर्शन अथवा उपस्थिती नसल्याने जुन्या पुलाचे पाडकाम करणार्‍या प्रोकलेनच्या वजनाने पुलाचा स्लॅब कोसळला आणि स्लॅबवरील पोकलेन थेट पिलर्सवरून खाली कोसळला. यामुळे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाची चर्चा महाड आणि पोलादपूर तालुक्यात सर्वत्र होऊ लागली आहे.

Exit mobile version