शेकापक्षाच्या 75 व्या वर्धापनदिनासाठी पोलादपूरचा ग्रामीण भाग सज्ज

पोलादपूरमधून रत्नागिरीकडे जाऊन पक्षवाढ करू-भाई एकनाथ गायकवाड

पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील ग्रामीण भागामधील शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता अमृतमहोत्सवी वर्धापनदिनासाठी सज्ज झाला असून वडखळ येथील मेळाव्यानंतर विचारांचे धन घेऊन केवळ पोलादपूर तालुक्यापुरतेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्येही पक्ष वाढवू असा विश्‍वास पोलादपूर तालुका चिटणीस तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भाई एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शेकापक्ष कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी वडखळ येथे उपस्थित राहण्यासाठी सज्जतेच्या गावोगावी बैठकींचे आयोजन केले असता भाई एकनाथ गायकवाड बोलत होते. याप्रसंगी सोबत पुरोगामी युवक संघटनेचे चंद्रकांत सणस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन वैभव चांदे आणि रानवडीचे माजी सरपंच निवृत्ती उतेकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलादपूर तालुक्यातील डाव्या विचारांचे मतदार कधीही अन्य राजकीय पक्षांत प्रवेश करत नसून ठाम असल्यानेच शेकापक्षाचा झंजावात गेल्या काही वर्षांमध्ये पंचायत समितीवर लाल बावटा फडकविण्यासोबतच रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकापचा सदस्य पोलादपूर तालुक्यातून पाठविण्याइतपत वाढला आहे. रायगड लोकसभा मतदार संघात आणि महाड पोलादपूर माणगांव विधानसभा मतदार संघातही यापुढे शेकापक्षाचा उमेदवार देण्यासाठी खास व्यूहरचना करण्यासंदर्भात शेकापक्षाच्या नेतृत्वाला या वर्धापनदिनानिमित्त विशेष आग्रह करणार असल्याचे यावेळी ठिकठिकाणच्या बैठकांवेळी भाई एकनाथ गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.

पोलादपूर तालुक्यातील सुमारे पाचशेहून अधिक स्त्री-पुरूष कार्यकर्ते वडखळ येथील शेकापक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्याला उपस्थित राहतील, असा विश्‍वास यावेळी भाई एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी पोलादपूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर 2 ऑगस्टरोजी लालबावटा फडकविण्यात येईल आणि ज्या ग्रामपंचायतीवर लाल बावटा फडकविला आहे. तेथील विकासकामांने प्रेरित ग्रामस्थमंडळी मोठया संख्येने मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहतील, असे यावेळी पुरोगामी युवक संघटना चिटणीस चंद्रकांत सणस यांनी सांगितले.

Exit mobile version