पोलादपूरला अवकाळीने झोडपले

शेतकर्‍यांच्या आंबा पीक, करवंद, फणसालाही धोका

| पोलादपूर | प्रतिनिधी |

गेल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने पोलादपूर तालुक्याला झोडपल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलादपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवकाळीचा जोर दिसून आला. यामुळे शहरात जनजीवन तात्पुरते विस्कळीत झाले असले तरी ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या आंबा पीक, करवंद, फणसालाही धोका निर्माण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी व्यग्र राहिलेल्या महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामसेवक, तलाठी आदी यंत्रणांना शनिवार, रविवार सुट्टी असल्याने या अवकाळीतील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत.

पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शनिवारी सायंकाळी उठलेल्या अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. एसटी स्थानक परिसर, पेट्रोल पंप, अंडरपास महामार्गावरील पाच ब्रिजेस, अंडरपास महामार्ग या ठिकाणी अवकाळीच्या झडपा दिसून आल्या. ग्रामीण भागामध्ये शेतकर्‍यांचे आंबा बागायती पीक उतरविण्यात येण्यापूर्वीच अवकाळीने दोन आठवड्यात सलग झोड उठविल्याने नुकसान झाले आहे. तालुक्यामध्ये आंबापीक घेणार्‍या बागायतदार शेतकर्‍यांचे 10 ते 500 कलमी आंबा पीकदेखील या अवकाळीने धोक्यात आणले आहे. एक पिकलेले आंबा फळ गळून पडल्याखेरीज आंब्याची पेटी पिकविण्यासाठी आढी न लावलेल्या शेतकर्‍यांना या अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचविले आहे.

पोलादपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आत्तापर्यंत वाशी एपीएमसी बाजारपेठेमध्ये करवंद, जांभुळ, फणसांची निर्यात केली असून, या निर्यातीचे 15 दिवस अजून शिल्लक असताना गेल्या आठवड्यात आणि या शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळीने व्यापार्‍यांनाही नुकसान पोहोचविले आहे. दरम्यान, सोमवारपासून पोलादपूर तालुक्यात पुन्हा प्रशासन व यंत्रणा सेवेत रूजू झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनातून कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version