| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर येथील ग्रामीण रूग्णालयाचा परिसर चौपदरीकरणाच्या भुसंपादन आराखडयात असूनही अद्याप संपादित झाला नसल्याने ग्रामीण रूग्णालयाचा परिसर कम्पाऊंडवॉलसह शाबूत आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. भाग्यरेखा पाटील आणि रूग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारीवर्ग या परिसरात वेळ मिळाल्यानंतर साफसफाई करण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरातील संरक्षक भिंतीच्या आतील भागात आठ मीटरपर्यंतची जमीन भूसंपादन आराखडयामध्ये दिसून येत आहे. मात्र, मूळमालक सूर्यकांत गरूड यांनी या भुसंपादनाच्या मोबदल्याबाबत हरकत घेतल्याने अद्याप संरक्षक भिंत फोडून आतील जमिनीचे संपादन करण्यात आले नाही. परिणामी, शहरातील पश्चिमेकडील सर्व्हिसरोडची लांबी अद्याप नियोजित लांबीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. पश्चिमेकडील सर्व्हिसरोड उंबरकोंडच्या रस्त्यापर्यंत होण्याची नियोजित नकाशाप्रमाणे आवश्यकता असताना हा सर्व्हिसरोड अंडरपासपासून केवळ शंभर मीटर्स ग्रामीण रूग्णालयाच्या आधीच संपुष्टात आला आहे.
पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाचा परिसर या भुसंपादनामध्ये संपादित न झाल्यामुळे संरक्षक भिंतीच्या आतील भागातील जमिनीवरील कागदकचरा तसेच अन्य टाकाऊ वस्तू गोळा करून परिसराची स्वच्छता करण्यासाठी साधारणपणे पहिल्या आणि तिसर्या शनिवारी डॉ. भाग्यरेखा पाटील, डॉ. राजेश सलागरे, डॉ. महाडीक तसेच परिचारिका स्वप्नाली गांधी, जाधव, मिश्रक हजवानी, पुरूष परिचारक तसेच चतुर्थ श्रेणी कामगार, आया अशा कर्मचारी वर्गाकडून हातात झाडू घेऊन नियमितपणे प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरामध्ये उन्हाळयाचा त्रास होऊ नये यासाठी मातीवर पाणी फवारून धूळ उडण्यास प्रतिबंधही केला जात आहे. यामुळे पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या स्वच्छता मोहिमेचा आदर्श पोलादपूर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अन्य कार्यालयांनीही घेण्याची गरज निर्माण झाली आहे.