पोलादपूरः पाणीटंचाईवर ठोस उपाययोजनांचा अभाव

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील गावे वाडयांच्या पाणीटंचाईवर ठोस उपायांचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.याचा विपरित परिणाम स्थलांतरावर होताना दिसत आहे.ग्रामीण भागात याचे सर्वााधिक लोण पसरले आहे.

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पोलादपूर तालुक्यामध्ये विविध जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली जात असल्याने टंचाई आराखडयातून टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी वनराई बंधारे, विहिरींचा गाळउपसा, बोअरवेलचे जलपुनर्भरण असे तीन महत्वाचे उपक्रम राबवून गायी-गुरे तसेच मानवी जीवनास पेयजल आणि आंघोळ, कपडे-भांडी धुण्याच्या अन्य दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी हातभार लावला. पाण्याची पातळी वाढण्यासाठी या तीनही उपक्रमांचा विशेष उपयोग झाला.

तालुका कृषी विभागाकडून समतल चर खणण्यामुळे पावसाळयामध्ये दररोज प्रति समतल चराद्वारे 2200 लिटर्स पाणी जमिनीमध्ये जिरविण्यात आल्याचे मानले जाते. पोलादपूर तालुक्यात याच तालुका कृषी कार्यालयामार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यांचा कोटयवधी रूपयांचा घोटाळा तालुक्याच्या पाण्याच्या समस्येला कायम ठेवण्यास कारणीभूत ठरला होता. त्यामुळे काही कर्मचारी निलंबित झाले होते.

जलजीवन माध्यमातून 48 कोटींमध्ये 52 पाणी योजनांसाठी खर्च होणार आहेत. मात्र, पुर्वीच्या पाणी योजना विद्युतबिले रखडल्याने, मोटारपंप जळाल्याने तसेच नदीलगतच्या जॅकवेल वाहून गेल्याने नादुरूस्त झाल्या असून याच योजनांना सिमेंटपाण्याने रंगवून कोटयवधी रूपयांच्या निधीचा अपहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील पाणीटंचाई, दरडप्रवणता आणि रस्ते दळणवळणाची दूर्गमता यामुळे बहुतांशी लोकसंख्या स्थलांतरीत झाल्याने टंचाईग्रस्त गांवांना पाणीपुरवठयाच्या टँकरची क्षमता आता खूपच कमी करण्यात आली आहे. यंदा 16 एप्रिल 2023 पासून चांभारगणी बुद्रुक आणि किनेश्‍वर या गांवांना तसेच कालवली गावातील पाटीलवाडी, पवारवाडी, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी आणि किनेश्‍वर पेढावाडी आणि तुटवली गललीची वाडी याठिकाणी पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती पंचायत समितीमार्फत प्राप्त झाली आहे.

पाणीटंचाई आराखडयातील बोअरवेल कार्यक्रमानुसार यशस्वी आणि अयशस्वी झालेल्या बोअरवेल आणि तालुक्यातील लोकांनी खासगीरित्या जमिनीला भोकं पाडून केलेल्या बोअरवेल यांची संख्या अगणित झाली आहे.

तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी, रस्ता आणि रेशनधान्य तसेच विविध विकासकामांचा पैसा हा स्थानिक पुढारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी यांच्या चेहर्‍यावर तजेला आणणारा ठरला आहे. मात्र, यामुळे गोरगरीब जनतेसाठी मपाण्यासाठी दाहिदिशा… आम्हा फिरविशी जगदिशाफ अशी परिस्थिती कायम राहिली आहे.

Exit mobile version