पोलादपूर नगरपंचायतीचे पाणीगळतीकडे दुर्लक्ष

नगरसेवक निखिल कापडेकर यांनी वेधले लक्ष
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
नगरपंचायत पोलादपूरच्या हद्दीतील रोहिदासनगर आंबेडकरनगरच्या रस्त्याच्या मध्यभागी एक व्हॉल्व्ह फुटल्यामुळे पुढील लोकवस्तीला पाणीपुरवठा होणे बंद झाले आहे तर फुटलेल्या व्हॉल्व्हमुळे रस्त्यामध्ये डबके तयार होऊन मोटारसायकलस्वारांसह दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याच्या घटना झाल्या आहेत. यासंदर्भात नगरसेवक निखिल कापडेकर यांनी लक्ष वेधले असूनही कोणतीही कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने न केल्याने पाणीगळती वेगाने होत आहे.
प्रभाग 2 आणि प्रभाग 3 मधील रोहिदासनगर आंबेडकरनगरच्या रस्त्याच्या मध्यभागी श्रीदत्तमंदिराजवळ गेल्या काही दिवसांपासून एक व्हॉल्व्ह फुटल्यामुळे मोठया प्रमाणात पाणीगळती होत असून यामुळे याच नगरांच्या सावित्री नदी लगतच्या लोकवस्तीला नळपाणीपुरवठा होत नाही. या परिसरात चिखलाचे साम्राज्य होत असल्याने श्रीदत्तमंदिराजवळ व्हॉल्व्हभोवतीच्या खड्डयामध्ये याबाबत प्रभाग 3 चे नगरसेवक निखिल कापडेकर यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीला तसेच नगरपंचायत पोलादपूरला या समस्येवर तातडीने उपाययोजना करून व्हॉल्व्ह बदलण्यासंदर्भात पाठपुरावा केला. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉल्व्हमधून मोठया प्रमाणात होणार्‍या पाणीगळतीमुळे अपघात आणि पाणीपुरवठयातील अनियमितता कायम राहिली आहे. पोलादपूर नगरपंचायतीचा रस्ता आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी या फुटलेल्या व्हॉल्व्हचे स्थान असल्याने एलऍण्डटी या ठेकेदार कंपनी हे काम करेल अशी अपेक्षा नगरपंचायत पोलादपूरच्या प्रशासनाने केली असून एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीच्या कक्षेबाहेर रोहिदासनगर आंबेडकरनगरचा हा रस्ता असल्यामुळे हे काम नगरपंचायत पोलादपूरने करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन्ही आस्थापनांच्या अक्षम्य दूर्लक्षामुळे ही पाणी गळती मोठया प्रमाणावर सुरूच राहिली आहे.

Exit mobile version