| पोलादपूर | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरारसाळगड भागातील गुरे रायगड जिल्ह्यातील ओंबळी भागातील जंगलात चरत-चरत आली होती. त्यापैकी तीन बैलांची चोरी करणार्या चार आरोपींना बैलांसह पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. चारही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली.
पोलादपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शरद तुकाराम गायकर (55) जात-गवळी, व्यवसाय शेती, रा. घेरारसाळगड गवळवाडी, ता. खेड जि. रत्नागिरी यांचे 3 बैल चरत-चरत ओंबळी गावातील जंगलात आले होते. मंगळवारी (दि.25) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चरण्यासाठी सोडण्यात आले असता, ते बैल चोरण्याच्या उद्देशाने आरोपी मासूम अजीम तालघरकर (24), रा. शिरवली, ता. महाड, मुरशद उस्मान कोर्डेकर (62), रा. शिरवली, ता. महाड, मुकेश पांडुरंग सकपाळ (40), रा. शिरवली, ता. महाड, शब्बीर उस्मान जोगिलकर (38), रा. कापडे बु., ता. पोलादपूर आले असता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ओंबळीच्या जंगलामध्ये धडक देत पोलादपूर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव व तपासिक अंमलदार पोलीस हवालदार सुतार व सहकारी यांनी या धडक मोहिमेत महत्त्वपूर्ण साथ दिली. आरोपींकडून पोलिसांनी प्रत्येकी 25 हजार रूपये किमतीचे असे एकूण 75 हजारांचे बैल जप्त केले आहेत. चारही आरोपींविरोधात पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.