। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये 30 मार्चपासून ते 14 एप्रिलपर्यंत वेगवेगळे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. सण, उत्सवांबरोबरच जयंती सोहळेही होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये 562 हून अधिक ठिकाणी मिरवणुका, शोभायात्रा तसेच दोन ठिकाणी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. सण, उत्सव व जयंती साजरी करताना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी दीड हजारांहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यामुळे सणांवर पोलिसांची नजर राहणार आहे.
जिल्ह्यामध्ये 30 मार्चला गुढीपाडवा आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात 22 ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. तसेच दोन ठिकाणी बाईक रॅली काढून हिंदू नववर्ष दिन साजरा केला जाणार आहे. 31 मार्चला रमजान ईद आहे. मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण मानला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात 232 ठिकाणी रमजान पठण होणार आहे. म्हसळा, खालापूर अशा अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. सहा एप्रिलला श्रीराम नववी साजरी केली जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये 150 हून अधिक श्रीरामाची मंदिरे आहेत. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त 133 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. 27 ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होणार आहेत. दहा एप्रिलला भगवान महावीर जयंती असणार आहे. जिल्ह्यात 28हून अधिक मंदिरे आहेत. जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 20 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. विधीवत पूजा केली जाणार आहे. 12 एप्रिलला हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे. जिल्ह्यात 511हून अधिक हनुमान मंदिरे आहेत. 289 ठिकाणी जयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जिल्ह्यात महामानवांचे 76 पुतळे आहे. जयंतीनिमित्त 263 ठिकाणी प्रतिमा पूजन आणि 94 ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये या पंधरा दिवसांच्या कालावधीत जयंती, उत्सव, सणांनिमित्त 562 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. सण, उत्सव साजरे होत असताना, तसेच मिरवणुका काढत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यामध्ये या कालावधीत 85 पोलीस अधिकारी, एक हजार 605 पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यामध्ये येणार्या काळात सण, उत्सव, जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात जिल्ह्यात सण साजरे करता यावेत, यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. दंगा काबू योजनांची रंगीत तालीम, सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी सायबर गुन्हे पथक आदी विविध यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सण-उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावेत.
सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड
कधी कोणता सण?
30 मार्च गुढीपाडवा
31 मार्च रमजान ईद
6 एप्रिल श्रीराम नववी
10 एप्रिल भगवान महावीर जयंती
12 एप्रिल हनुमान जयंती
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती