पोलादपूर: गुराख्यावर रानगव्याचा हल्ला

। पोलादपुर । प्रतिनिधी ।

कुडपण बुद्रुक आणि कुडपण खुर्द येथे एका तरूण गुराख्यावर रानगव्याने हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि.29) घडली. यामध्ये गुराख्या गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कुडपण खुर्द येथील सचिन रघुनाथ शेलार त्याची गुरे चरण्यासाठी रानात घेऊन गेला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका रानगव्याने त्याच्यावर पाठीमागून येऊन जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेलार अतिशय गंभीररित्या जखमी झाला. ग्रामस्थांनी त्याला तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालय दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला महाड आणि तेथून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले. मात्र, प्रकृती स्थिर नसल्याने सचिन शेलार यास मुंबई येथील केईम हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून त्याच्या पाठिला, डोक्याला तसेच हातांना जोरदार मार लागला आहे.

या हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच महाडचे वनक्षेत्रपाल साहु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपुरचे वनपाल श्याम गुजर, कोतवाल बुद्रुकचे प्रशांत गायकर, ढवळे येथील वनरक्षक दिलीप जंगम व उपसरपंच रविंद्र चिकणे, माजी सरपंच हनुमंत शेलार, ग्रामस्थ देवजी दाजी शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी असता रानगव्याच्या चारही पायांच्या खुरांचे ठसे आढळून आल्याने गवा धिप्पाड आणि अजस्त्र असावा, असा कयास वर्तविण्यात आला आहे.

Exit mobile version