पोलादपूरकरांनी अनुभवला ग्रामसभेचा आनंद

विकास योजनेच्या आराखड्यातून काय मिळणार?
| पोलादपूर । वार्ताहर ।

तालुक्याच्या गावाची ग्रामपंचायत असल्याने नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यापूर्वीच्या ग्रामसभेच्या आनंदाला मुकल्याने प्रथमच पोलादपूरकरांना पुन्हा मत मांडण्याचा आनंद मिळाला. यावेळी अनेकांनी विकास योजनेच्या आराखडयासाठी विविध मते आणि सूचना केल्या असल्या तरी पोलादपूरवासियांना राजकीय इच्छाशक्तीखेरिज काय मिळू शकेल का, हा कळीचा मुद्दा प्रशासनाकडूनच उपस्थित करण्यात आला.

नगररचना संचालक, महाराष्ट्र राज्य पुणेचे अविनाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास योजनेच्या प्रसिध्दीपूर्व बैठकीचे आयोजन कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी सहसंचालक जितेंद्र भोपाळे व विजय वाघमोडे, मुख्याधिकारी कोमल कराळे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, विरोधी गटनेता दिलीप भागवत, प्रशासन कक्षअधिकारी महादेव सरंबळे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक तसेच राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. यावेळी पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रातील लोकसंख्येच्या आधारे आगामी 20 वर्षांसाठी शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी विविध विकासांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यासाठी या विकास योजनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय संस्था व लोकसहभागाची भूमिका अपेक्षित केल्यानुसार शहरातील सुमारे शंभराहून अधिक उपस्थिती या बैठकीवेळी लाभलेली दिसून आली.

Exit mobile version