साडेआठ लाखांची वाहने जप्त
| महाड | प्रतिनिधी |
एमआयडीसी पोलिसांनी बेकायदेशीरपणे वाहने बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे आठ लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस ठाण्यातील कर्मचारी जीवन बाबू पवार यांच्या खबरीनुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महपुस मजीदुल्हा खान (38, धंदा-भंगार, रा. नांगलवाडी, ता. महाड, जि. रायगड) याच्याकडे कोणतेही परवाने नसताना विविध वाहने संशयास्पद स्थितीत मिळून आली. यामध्ये पिवळ्या रंगाची आयशर स्कूल बस (एमएच 04 जी 7634), पिवळा टाटा छोटा हत्ती (एमएच 09 डीए 9921), सिल्व्हर होंडा सिटी कार (एमएच 43 एन 6868), मॅट डोअर (एमएच 06 बीजी 1636) व पांढरी मारुती स्विफ्ट (एमएच 02 बीजे 8694) यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत सुमारे 8.50 लाख रुपये आहे.
ही कारवाई 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नडगाव हद्दीत काळभैरव मंदिराजवळ करण्यात आली. महपुस मजीदुल्हा खान याने त्याच्या ताब्यातील वाहनांबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोहवा पवार करत असून, कारवाईदरम्यान महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि जे.एच. माने उपस्थित होते.
