सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन तत्पर

| पनवेल | प्रतिनिधी |

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम टिकून राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. परिसरात शांततापूर्ण वातावरण अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला कसा आळा बसवता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल. नागरिकांना कोणतीही अडचण किंवा काहीही तक्रार असल्यास कोणताही संकोच न बाळगता पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी निर्भयपणे राहावे, नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येतील व समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन उरण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी केले.

उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिष निकम यांची गुरुवारी (दि.16) रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदली झाल्याने त्यांच्या जागी न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी शुक्रवारी (दि.17) उरण पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर तसेच वेळप्रसंगी कर्तव्यकठोर अशी त्यांची पोलीस खात्यात विशेष ओळख आहे. वपोनि राजेंद्र कोते यांनी अल्पावधीतच त्यांनी विविध गुन्ह्यांचा छडा लावला असून, गुन्हेगारांचा मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस खात्यात त्यांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना अनेकदा गौरविण्यातही आले आहे.

Exit mobile version