महिलांची फसवणूक करणारा महाठग पोलिसांच्या जाळ्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

रत्नागिरी जिल्ह्यातील 33 वर्षीय योगेश यशवंत हुमणे हा तरुण सुंदर मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करून जवळीक वाढवायचा. त्यातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचा. दरम्यान, महाठग अखेर नेरळ पोलिसांच्या हाती लागला आहे. आपल्या पहिल्या पत्नीला भेटायला आलेला योगेश हुमणे सध्या नेरळ पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील बोपेले येथे राहणार्‍या 34 वर्षीय विवाहितेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार योगेश यशवंत हुमणे याच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत होत्या. बोपेले येथील तक्रारीदार महिलेने पतीच्या विरोधात मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे याआधी लग्न झाले असताना माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे नमूद केले होते. त्याने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून 15 ते 20 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. योगेशने अविवाहित असल्याचे भासवून पीडितांना लुटले आहे. दोन मुलींशी लग्न करून तिसर्‍या मुलीसोबत लग्न करण्याची तयारी त्याने सुरू केली होती. मात्र, त्याआधी नेरळ पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला आहे.

33 वर्षीय योगेश हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका खेडजवळील जामगे येथील राहणारा आहे. महिलांची फसवणूक करण्यात पटाईत असलेल्या योगेशने आजवर अनेक सुंदर मुलींची फसवणूक केलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून त्या महिलेला किंवा मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केलेली होती. त्यात एक महिला पोलीस कर्मचारी असल्याचेदेखील बोलले जात आहे. याबाबत तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार, योगेशला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. योगेशने कार खरेदी केली होती. मात्र, ती कार पत्नीच्या नावे होती. त्यामुळे आपल्या नावावर कार करायची असल्याने पत्नीला भेटायला बोपेले येथे आलेल्या योगेशच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Exit mobile version