। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील भागीर्थीखार गोफण येथे एक वृध्द मच्छी विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन एका जोडप्याने चोरल्याची घटना घडली. त्या जोडप्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तेथून रोहा शहराकडे पळ काढला. रोहा पोलिसांनी खारी चेकपोस्ट येथे नाकाबंदी केली असता तेथूनही त्या जोडप्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध मच्छी विक्रेती महिला ही अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील असून ती भागीर्थीखार येथे मच्छी विकण्यासाठी आली होती. नीलिमा नारायण वरसोलकर (65) असे या महिलेचे नाव आहे. त्यावेळी एक जोडपे दुचाकीवरून येऊन थोडी सुखी मच्छी विकत घेतली व मच्छी विक्रेत्या महिलेने गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुन्हा काही वेळानी त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून पळ काढला. यावेळी वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती दिली.
पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अमलदारांसह नाकाबंदी लावली. काही वेळातच हे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणार्या पोलिसांनी त्याना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वेगाने गाडी पळवून तेथूनही पळ काढला. त्यावेळी नाकाबंदी करणारे पो.ना. शिरसाठ, पो.शी. अनिल पाटील, पो.शी. अंगद गुट्टे, पो. शी. मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला आणि अत्यंत चपळाईने काही अंतरावरच त्यांना रोखून ताब्यात घेतले. नितीन सुरेश गुंडीये (36), मोहिनी नितीन गुंडिये (33) असे त्यांचे नाव असून सध्या गोरेगाव-मुंबई येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 3 तोळ्याची सोन्याची माळ हस्तगत केली.