आरोपी पिस्तुलासह अटक; पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ची कारवाई
। पनवेल । संजय कदम ।
मोक्कामधून मोकाट सुटलेला व अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यामधील आरोपीस अग्निशस्त्रासह पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 कडून अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त बी.के.सिंग, अपर पोलीस आंयुक्त (गुन्हे) डॉ. बी.जी.शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनीं अवैध अग्नीशस्त्र विरोधी मोहीम पंधरवडा राबवण्याचे आदेश दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा कक्ष-2, नवी मुंबईचे पो.उप निरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहीतीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील मोक्का केसमधुन नुकताच सुटलेला, गोळीबार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, पोलिसांवर हल्ले करणारा सराईत गुन्हेगार व ठाणे आयुक्तालयाच्या अभिलेखावर बलात्कार, पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये शोध सुरु असलेला आरोपी प्रतिक मनोहर शिवपुज हा तळोजा मध्यवर्ती कारागृहाजवळ, पिस्तुलासह कारमधुन येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.
याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ) विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि गणेश कराड, प्रवीण पाटील, पो उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, पो.ह.अनिल पाटील, गडदे, सुनील कुदले, दिपक डोंगर, सचिन म्हात्रे, रुपेश पाटील, प्रशांत काटकर, सुनील साळुंखे, भोपी, सुर्यवंशी यांचे पथक तयार करण्यात आले. तसेच तळोजा कारागृहाच्या जवळ सापळा रचण्यात आला. कारमधील इसमास पोलिसांची चाहुल लागताच त्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार फुटपाथवर चढवल्याने कारचा टायरचा फूटून ती थांबली.
त्यानंतर पोलिसांनी कारला घेराव घालुन प्रतिक मनोहर शिवपुजे (वय, 27, रा. गणपत म्हात्रे बिल्डींग, रुम नं. 401 चौथा माळा, शिवाजी तलाव पाळी रोड, घणसोली) याच्यासोबत लक्ष्मण माणिक राठोड (वय, 21, ऱा. न्यु गोल्डन नगर झोपडपट्टी, नौसील नाका, रुम नं. 249, घणसोली) यास ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून एक देशीं बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळाले. त्यांचेविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रतिक शिवपुजेवर कापुरबावडी, कोपरखैरणे, एपीएमसी, वाशी, रबाळे, मुलुंड, ठाणे नगर येथे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी लक्ष्मण माणिक राठोड याच्यावर रबाळे येथे 3 गुन्हे दाखल आहेत.