मराठा आंदोलकांना मारहाण करणारे पोलिसांच्या ताब्यात

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून मराठा आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पाच जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून पिकअप टेम्पो घेऊन मुंबईत जाणाऱ्या मराठा तरुणांना आठ ते दहा जणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.31) सायंकाळी घडली होती.

या मारहाणीत पाच मराठा तरुण जखमी झाले आहेत. पनवेल शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच, इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील काही मराठा तरुण रविवारी दुपारी पिकअप वाहनाने जुन्या मुंबई–पुणे मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात होते. ही गाडी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील डेरवली पुलाच्या जवळ आली असताना, त्यापुढील लाल रंगाच्या कारला घासली गेली. यावरून कारचालक आणि मराठा तरुणांमध्ये वाद होऊन भांडण झाले व त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या गोष्टीचा राग मनात धरून कारचालकाने फोन करून त्याच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी कारचालकाने जेएनपीटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टी पॉइंटच्या पुढे पुष्पकनगर समोरील पहिल्या पुलाजवळ मराठा तरुणांचे वाहन अडवले.

त्यानंतर आरोपी कारचालक व त्याच्या साथीदारांनी चंद्रकांत बाबाजी थोरांधळे, शाम बबन केमगिरे, गणेश ज्ञानेश्वर मिंडे, रामदास पिंगळे, सुधाकर ढवळे या तरुणांना हाताबुक्क्यांनी तसेच, टिकावच्या लाकडी दांडक्याने व फायबर काठीने मारहाण करून जखमी केले. जखमी तरुणांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून देत, गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यापैकी पाच जणांना अटक केली.

Exit mobile version