पेणमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे 5 जण पोलिसांच्या ताब्यात

न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी
। पेण । प्रतिनिधी ।
पेण येथील सरकारी हॉस्पिटलच्या परिसरात संशयित इन्होवा क्रिस्टा गाडीतून अंदाजे दोन कोटींच्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करताना पेण पोलिसांनी रविवारी (दि.3) 5 जणांना रंगेहाथ पकडले. त्यांना सोमवारी कोर्टासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

समुद्रातून व्हेल माशांची उलटी गोळा करून तीची तस्करी करीत असणार्‍या तस्करखोरांना अनेकदा पोलिसांनी अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही या माशाच्या उलटीची तस्करी करून यामधून करोडो रुपये कमविले जातात. व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेणमध्ये होणार असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली होती.

या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पेण उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात एमएच. 47 एटी. 8879 ही इन्होवा क्रिस्टा गाडी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्या गाडीची कसून तपासणी केली. त्यावेळी गाडीत व्हेल माशाची अंदाजे 2 किलो वजनाची उलटी सापडली. या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास दिड ते दोन कोटी रुपयांच्यावर आहे.

या गुन्ह्यांतर्गत विजय परदेशी, प्रेमविर सिंग (रा. उत्तर प्रदेश), सदानंद मोरे (रा. रत्नागिरी), अमोल राघो (रा. नागपूर), अजय आबांवडे (रा. सांगली) अशा पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सोमवारी पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या संपूर्ण घटनेचा तपास रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम. जे. घाडगे करीत आहेत.

Exit mobile version