| पनवेल | वार्ताहर |
सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी खारघर पोलिसांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबाबत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांकडून पालकांना घरोघरी प्रबोधन केले जाणार असल्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्यांचा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीकडे अधिक कल आहे. मात्र, असे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच अनेकदा जास्त पैसे मिळवण्याच्या प्रलोभनातून बँक खात्यांविषयाची सर्व गोपनीय माहितीची देवाण-घेवाण केली जाते. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी खारघर पोलिसांकडून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना माहिती दिली जात आहे.
यावेळी तरुण-तरुणींकडून खासगी आयुष्याची माहिती, छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्याच्या प्रवृत्तीमुळे काही समाजकंटक पैसे उकळत असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच फसवणूक झाल्यास सायबर गुन्ह्यांबाबतचे कायदे, ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याच्या पद्धती याशिवाय मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची माहिती दिली.