वडवली फाटा येथे पोलिसांची नाकाबंदी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन जवळील वडवली फाटा येथे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी विशेष नाकाबंदी सुरू केली आहे. या मोहिमे दरम्यान प्रामुख्याने दुचाकी वाहनधारकांना थांबवून त्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती केली जात असून, सुरक्षिततेचा संदेश दिला जात आहे.

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत जुना आणि कायदेशीर नियम आहे. मात्र, ग्रामीण व स्थानिक पातळीवर या नियमाचे पालन होताना दिसत नाही. दुसरीकडे, तालुक्यात अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विशेषतः दिवेआगर, श्रीवर्धन आणि म्हसळा मार्गावर अनेक तरुण अत्यंत वेगाने दुचाकी चालवत असल्याचे चित्र दिसते. अशा वेगात नियंत्रण सुटल्यास भीषण अपघात होऊन जीव जाण्याचा धोका असतो. हेच वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी आता वडवली फाटा येथे कडक नाकाबंदी सुरू केली आहे. श्रीवर्धन आणि म्हसळा बाजूकडे जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराची चौकशी केली जात असून त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या या अचानक तपासणीमुळे वाहनधारकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नाकाबंदी दरम्यान हेल्मेट नसलेल्या चालकांना थांबवले जात असल्याने, पोलिसांनी दंडात्मक पावती फाडली का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.

Exit mobile version