नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली असून, हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकारातून ‘अपघातमुक्त दुचाकी प्रवास’ ही मोहीम राबवली जात आहे.
गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात 225हून अधिक नागरिकांनी रस्ते अपघातात जीव गमावल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांचा यात मोठा वाटा असल्याने, हेल्मेट वापर सक्तीचा करण्यावर पोलिसांचा भर आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी-पुणे राज्य मार्गावरील वडवली फाटा येथे नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहन परवाना नसणे अशा नियमभंगांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेगात दुचाकी चालवण्याच्या घटना चिंताजनक ठरत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, पर्यटनासाठी येणाऱ्या काही बेफिकीर पर्यटकांकडून मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या प्रकारामुळे स्थानिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधातही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हेल्मेट न वापरल्यास अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्याचप्रमाणे, चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट न लावल्यास एअरबॅग कार्यरत होत नसल्याने जीवितहानीची शक्यता वाढते, याचीही जाणीव करून देण्यात येत आहे. पोलिसांकडून होणाऱ्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता गावातील अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेट सक्ती बाबत शिथिलता ठेवली जाणार असून, राज्य मार्ग आणि महामार्गांवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
नियम पाळा, सुरक्षित राहा, ट्रिपल सीट टाळा, वेगमर्यादा पाळा, सुरक्षित अंतर ठेवा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नका आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नेहमी हेल्मेटचा वापर करा. हेल्मेट हा केवळ कायदेशीर नियम नसून, दुचाकी अपघातात प्राण वाचवणारा महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे.
संतोष आवटी,
सहाय्यक पोलीस निरिक्षक







