डेब्रिज टाकून शेकडो कोटींचा चुना
| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीए प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपासाठी सुरू असलेल्या 111 हेक्टर क्षेत्रातील भराव कामात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या ठिकाणी माती-मुरुमा ऐवजी टाकाऊ डेब्रिज टाकून सिडको-जेएनपीएला शेकडो कोटींचा चुना लावला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
जेएनपीएने रांजणपाडा-जासई दरम्यान 111 हेक्टर क्षेत्र आरक्षित करून कोट्यवधी रुपयांचा निधी भरावासाठी दिला होता. मात्र, ठेकेदारांनी नियमानुसार माती, मुरुम, दगड न वापरता मुंबई-नवी मुंबईतून मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर करून सरळ फसवणुकीचा खेळ उभा केल्याचे उघड झाले आहे. एकीकडे भरावाचे अधिकृत पैसे आणि दुसरीकडे डेब्रिज टाकण्यासाठी मिळणारा मोबदला अशा दुहेरी कमाईच्या लालसेपोटी कोट्यवधींची लूट सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या गैरप्रकाराची माहिती समोर येताच प्रकल्पग्रस्तांनी संतप्त प्रतिक्रिया देत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर काही काळ काम बंद ठेवले गेले, परंतु त्यानंतरही पुन्हा दिवसाढवळ्या डेब्रिजचा भराव सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
35 ते 40 वर्षे उलटूनही सुमारे 3 हजार शेतकरी आणि त्यांच्या 12 हजार वारसांना साडेबारा टक्के भूखंड मिळालेले नाहीत. त्यातच अशा प्रकारचे घोटाळे उघड होत असल्याने प्रकल्पग्रस्तांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. विशेष म्हणजे, इतका मोठा भ्रष्टाचार उघड होत असतानाही जेएनपीए प्रशासन मौन बाळगून आहे. याबाबत जेएनपीएचे अधिकारी वर्ग कोणतीच प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.







