| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील टोरंट कंपनीच्या माध्यमातून साई डोंगर पाली या परिसरातील हजारो हेक्टर जमीनीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी लोकांना टोरंट कंपनीच्या तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ती दली जमिन कंपनीकडून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या भागातील मोहमाळवाडी, आंबेवाडी, पाली आदिवासी वाडी येथील काही भागांत वनविभागाच्या काही दळी जमिनी आहेत. त्या जमिनीतून येथील 25 शेतकरी वेगवेगळी पिके घेत आहेत. त्यांनी काही जमिनीवर आंबा लागवड देखील केली आहे. आणि याच जमिनीमध्ये टोरंटो पॉवर कंपनीने काही कामे सुरु केली आहेत. माती परिक्षण, तसेच जमीनीमध्ये काही यंत्रसामग्री उतरविल्या आहेत. याबाबत टोरंटो पॉवर प्रशासनाला तसेच वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्याचबरोबर या जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. तरीसुद्धा वन विभाग याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्य करत असून या सर्वांचा आधिवास या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात येथील नागरिकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.







