पोलीस शिपायाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

| सोलापूर | प्रतिनिधी |
सध्या सर्वत्र दीपावलीची धामधूम सुरू असतानाच भाऊबिजेच्या दिवशी सोलापूर शहरात केशवनगर पोलीस वसाहतीत एका पोलीस शिपायाने स्वतःवर पिस्तूलने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बुधवारी (दि.15) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. राहुल शिरसट (वय 35) असे आत्महत्या केलेल्या पोलीस, शिपायाचे नाव आहे.

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले राहुल शिरसट हे पोलीस आयुक्त बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल दाखल झाले. शिरसट यांनी सरकारी पिस्तूलने स्वतःच्या हनुवटीवर गोळी झाडली. दीपावलीत फटाके फोडले जात असल्यामुळे शिरसट यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचा आवाज पोलीस वसाहतीत लगेच लक्षात आला नाही. दरम्यान, शिरसट यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मृत शिरसट हे 2011 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. 2017 साली त्यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात बदली करून घेतली होती. त्यांचे अख्खे कुटुंबीय पोलीस दलात आहे. त्यांचे वडील सेवानिवृत्त सहायक फौजदार असून पत्नी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात तर भाऊ शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. बहीण पोलिस अधिकारी आहे.

Exit mobile version