|अलिबाग | प्रतिनिधी|
पेझारी येथील दुर्वांकुर हॉटेलजवळ रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कोपर येथील रहिवासी मनोज सुभाष ठाकूर गंभीर जखमी झाले.
मनोज ठाकूर राहणार कोपर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना चारचाकी वाहनाने त्यांना पेझारी चेकपोस्ट जवळ धडक दिली. यावेळी कार चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या अपघाताची माहिती चेकपोस्टवर ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल समीर म्हात्रे यांना मिळाली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर मनोज ठाकूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यावेळी रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस कॉन्स्टेबल समीर म्हात्रे यांनी स्वतःच्या कारमधून जखमी मनोज ठाकूर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलविण्यात आले.
