चिरनेर परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त
| चिरनेर | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार (दि.20) पासून सुरुवात झाली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी.खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाच्या नियोजित परीक्षा केंद्रावरदेखील शुक्रवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. ही दहावीची परीक्षा 18 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. मराठी प्रथम भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला आरंभ झाला आहे. परीक्षा केंद्र संचालक रेखा धराडे व परीक्षा उपकेंद्र संचालक आनंद चिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक सहकार्य करीत आहेत.
परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेक पालक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा परीक्षा क्रमांक कोणत्या ठिकाणी आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. परीक्षेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यात कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असून, रायगड जिल्ह्यामध्ये या अभियानांतर्गत दक्षतेने पाहणी केली जात आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष पी. पी. खारपाटील यांनी दिली. चिरनेर परीक्षा केंद्रातून मराठी माध्यमाचे 228 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची दहा ब्लॉकमधून आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पी. पी. खारपाटील, उपाध्यक्ष राजेंद्र खारपाटील, संचालक अर्चना ठाकूर, समीर खारपाटील, सागर खारपाटील प्रशासकीय अधिकारी व्ही. ए. पाटील, मुख्याध्यापक मिलिंद पट्टेबहादूर, केंद्रप्रमुख रेखा धराडे, उपकेंद्र प्रमुख आनंद चिर्लेकर तसेच अन्य शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
