रस्त्याच्या कामासाठी पोलीस बंदोबस्त: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| नेरळ । वार्ताहर ।
माथेरान शहरातील कच हाऊस ते गुलिस्तन बंगला या लाल मातीच्या रस्त्याचे धूळ विरहित रस्त्यात रूपांतर करण्याचे काम पालिकेने मंजूर केले होते. मात्र अश्‍वपाल संघटनेने हा रस्ता घोड्यांच्या रायडिंगच असून तेथे क्ले पेव्हर ब्लॉक लावू नये असे पत्र देवून आक्षेप घेतला होता. त्यामुळे माथेरान पालिकेने बंद करून ठेवलेले या रस्त्याचे काम जिल्हा पोलिसांनी प्रसंगी पोलीस बंदोबस्त देवून पूर्ण करावे असे लेखी आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

माथेरान गिरीस्थान नगरपरिषद आणि मॉनिटरिंग कमिटीने मंजूर केल्याप्रमाणे दस्तूरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा महत्मा गांधी रस्ता धूळ विरहित बनविण्याचे काम शासनाने मंजूर केले आहे. त्या रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात येत असून आतापर्यंत रिगल नाका पर्यंत हा रस्ता धूळ विरहित झाला आहे. परंतु या रस्त्यावरील वखार नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा भाग धूळ विरहित करण्यास स्थानिक अश्‍वपाल संघटनेने विरोध केला होता. त्याचवेळी अश्‍वपाल यांना या रस्त्याचे काम बंद पाडले आहे. अश्‍वपाल यांचा निषेध करण्यासाठी आणि सदर रस्त्यावरील मंजूर असलेले क्ले पेव्हर ब्लॉकचे काम त्वरित सुरू करण्याकरिता त्या परिसरातील रहिवाशांनी 24 फेब्रुवारी रोजी नगरपरिषद बाहेर ठिय्या आंदोलन केले होते.

रस्त्यावर दोन्ही मार्गांवर पोलीस ठाणे माथेरान, नगरपरिषद कार्यालय, महसूल अधीक्षक कार्यालय, माथेरान पालिकेचे बीजे हॉस्पिटल,सेंट झेवियर स्कूल, प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर आदी महत्त्वाच्या संस्था आहेत. मात्र त्यानंतर देखील पालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने वन ट्री हिल परिसरातील महिला यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी माथेरान शहरातील श्रीराम चौक येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.

दरम्यान, प्रशासन कोणतेही प्रकारची हालचाल करीत नसल्याने पालिकेने मंजूर केलेल्या आणि कामाचे कार्यादेश दिलेल्या वन ट्री परिसरातील महिलांनी कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथे जावून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यावेळीच माथेरान मधील क्ले पेव्हर ब्लॉकची कामे बंद ठेवण्याचे आदेश सर्वोच् न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी दिले होते. परिणामी कच हाऊस ते गुलिस्तान बंगला या लाल मातीच्या रस्त्याचे धूळ विरहित रस्त्यात रूपांतर करण्याचे काम बंद पडले होते. मात्र या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्या आधी अश्‍वपाल यांनी दादागिरी करून रस्त्याचे काम बंद केले होते.त्यामुळे हा मुद्दा जिल्हाधिकारी यांनी महत्वाचा मानून आपल्या कार्यालयाकडून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक यांना 17 मार्च रोजी पत्र पाठवून माथेरानमधील कच हाऊस ते गुलिस्तान बंगला या रस्त्याचे काम आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्त देवून सुरू करून अल्पावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version