धूळ विरहित रस्त्याची कामे रखडली
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील रस्ते धूळ विरहित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य सरकारचा नगरविकास यांच्याकडून रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात येत होते. मात्र, स्थानिक अश्वपाल संघटना व मूलनिवासी अश्वपाल संघटना यांनी पेव्हर ब्लॉक विरुद्ध न्यायालयात धाव घेतल्याने माथेरानमधील रस्त्यांची कामे रखडली आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने शहरातील रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याची कामे गेली पावणे तीन वर्षे रखडली आहेत. दरम्यान, क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्यांसाठी माथेरान पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण न्यायालयात दाद मागत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
माथेरानमधील धूळ विरहित रस्त्यांबाबत स्थानिक अश्वपाल संघटना व मूलनिवासी अश्वपाल संघटना तसेच अन्य दोन संघटनांनी सर्वोच्य न्यायालयात पिटिशन दाखल केले आहे. ते पिटिशन दाखल करून घेताना सर्वोच्य न्यायालयाने 22 फेब्रुवारी 2023 रोजी माथेरान मधील सर्व रस्त्यांची कामे पुढील दोन महिने थांबवण्यात यावीत, असा निर्णय दिला होता. त्यानंतर लागलीच माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून सुरु असलेली रस्त्यांची कामे थांबविण्यात आली. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने माथेरान शहरातील मुंबई महानगर परदेंश विकास प्राधिकरणाकडून दस्तुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा साडेचार किमी लांबीचा महात्मा गांधी रस्ता तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आणि काही कामे सुरु असलेल्या अशा 11 रस्त्यांची धूळ विरहित रस्त्यात रूपांतर करण्याची न्यायालयाच्या स्थगिती आदेशाने कामे थांबविण्यात आली होती.
22 फेब्रुवारी 2022 च्या आदेशाने ही कामे पुढील दोन महिने थांबवली गेली होती आणि त्याला आता तब्बल तीन वर्षे म्हणजे 36 महिने पूर्ण होत आली आहेत. मात्र, माथेरान शहरातील ती सर्व विकास कामे सुरु व्हावीत आणि शहराचा थांबलेला विकास गाडा पुन्हा रुळावर यावा, यासाठी माथेरान नगरपरिषदेकडून किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम माथेरानमधील धूळ विरहित रस्त्यात रूपांतर करण्याची कामे बंद आहेत. त्या आदेशाचा थेट परिणाम माथेरानमधील विकास कामांवर झाला आहे.
शहरातील 11 रस्त्यांना स्थगिती
माथेरान शहरातील एन.सी. शहा ते विठ्ठल मंदिर पंचवटी नगर रस्ता, आचार्य अत्रे रस्ता, किंग एडवर्ड रस्ता, सुमती विलास नाका ते बार हाऊस नाक्याकडे जाणारा रस्ता, लोअर लुईजा रोड ते हनिमून पॉईंटकडे जाणारा रस्ता, छ. शिवाजी महाराज रस्ता, फाउंटन लॉज नाक्याकडे जाणारा रस्ता, रिगल नाका ते शब्बीर बिर्याणीवालाकडे जाणारा रस्ता, आचार्य अत्रे जंक्शनकडे जाणाराचा रस्ता, अप्पर लुईजा हनिमून पॉईंट जंक्शनची दुरुस्ती, बांधकाम कोरोनेशन पॉईंटकडे जाण्यासाठी रस्ता, नाका रोड व जहांगीर माणिकजी जंक्शनकडे जाण्यासाठी पिसरनाथ वल्ली रस्ता, फाउंटन लॉज नाका बांधकाम व दुरुस्ती, कोतवाल रस्ता व आकाशगंगाकडे जाणारा पॅनोरमा हॉटेल नाका दुरुस्ती आणि बांधकाम करणे या 11 रस्त्यांचा समावेश होता.