सुसज्ज अशी गॅलरी, खेळाडू व समालोचन कक्ष, स्थानिक व्यावसायिकांचे स्टॉल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना खेळण्याची संधी मिळावी, यासाठी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तसेच पीएनपीचे सर्वेसर्वा नृपाल पाटील यांच्या पुढाकाराने अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानात क्रिकेटचा थरार रंगणार आहे. 19 ते 23 या कालावधीत होणार्या क्रिकेट महासंग्रामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचा आनंद स्थानिकांना घेता येणार आहे. या स्पर्धेसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा अनुभवण्याची आणि पाहण्याची क्रीडाप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यू.व्ही. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित अलिबाग, मुरूड व रोहा तालुका मर्यादित डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुरूड डिफेन्डर्स, शहापूर स्माशर्स, खंडाळे स्टॅलिअन्स, आंबेपूर टायगर्स, रामराज रायडर्स, चौल चेसर्स, रेवदंडा रॉयल्स, वळके अवेंजर्स, बेलोशी बिग बुल्स, नांदगाव निंजास, मापगाव मार्वल्स, मुरूड थंडर्स, कुर्डूस किंग, चेंढरे चॅम्पियन, सारळ स्ट्रायकर्स, उसरोली वंडर्स, खारगांव हंटर्स, वरसोली चॅलेंजर्स, थळ टायपहुन्स, आवास अल्फास, अलिबाग वॉरिअर्स, अलिबाग सुपर किंग, रोहा रेंजर्स, राजपुरी पॅथर्स या निमंत्रित 24 संघांचा स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे.
आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट सामन्यांचे नियोजन अलिबागमध्ये करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्पर्धेची तयारी आहे. त्यामध्ये सुसज्ज असे खेळाचे मैदान, पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांना प्रत्यक्ष सामना आनंद घेता येणार अशी सुस्सज अशी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच युट्यूबच्या माध्यमातूनही घरबसल्या स्पर्धादेखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. खेळाडूंसह क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी येणार्यांना खाद्यपदार्थाचा आनंद घेता यावा, यासाठी स्थानिकांचे स्टॉल्स राहणार आहेत. त्यात महिला बचत गटांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील येणार्या दिग्गजांसाठीदेखील सुसज्ज असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था
पीएनपी चषकाचे हे दुसरे पर्व आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी पुरुषांबरोबरच महिलादेखील आवर्जून येतात. महिलांना मैदानात प्रत्यक्षपणे ही स्पर्धा पाहता यावी, यासाठी खास महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी असणार आकर्षक बक्षिसे
प्रथम क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला तीन लाख रुपये, तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, गोलंदाज यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तीन आकर्षक दुचाकी व इतर विविध आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने दिली जाणार आहेत.