। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील शेतकर्यांच्या जमिनीमधून दहेज-नागोठणे गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेती नापीक झाली असून मोबदला मिळाला नसल्याने शासनाने संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांना देण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील शेत जमिनींमधून रिलायन्स गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. कडाव परिसरातील शेतकर्यांच्या शेतातून रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीकडून खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु, पाईपलाईन टाकत असताना केलेले खोदकामाचे दगड माती हे सर्व शेतात पडून असल्याने गेली अनेक वर्ष शेती नापीक झाली असून त्या शेतातून कोणत्याही प्रकारचे पिक घेता येत नाही. त्यामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान रिलायन्स गॅस पाईपलाईन लिमिटेड या कंपनीकडून भरपाई देण्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्र्यांकडून शेतकर्यांना देण्यात आले होते. परंतु, त्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामे करावे त्यानंतर नुकसान भरपाई देऊ असे रिलायन्स कंपनीकडून शेतकर्यांना सांगण्यात आले. परंतु, तहसीलदारांनी आदेश देऊन देखील ग्राम महसूल अधिकार्यांनी पंचनामे केले नाहीत. त्यामुळे कडाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देऊन शेतकर्यांना योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.