। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड मंडळ सुरक्षा रक्षक अधिकार्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षक वृषाल पाटील यांनी केला आहे. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.15) ते उपोषणाला बसले आहेत.
वृषाल पाटील यांच्या तक्रारीनुसार, ते जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत आहेत. सध्या सुरक्षा रक्षक म्हणून तळोजा येथील इंडियन ऑईल येथील अस्थापनेत सेवा करीत आहेत. मागील दोन वर्षापासून या ठिकाणी नोकरी करीत आहेत. मात्र, वृषाल पाटील यांना प्रतिक्षा यादीत पुन्हा घेण्यात यावे, असा ईमेल सुरक्षा रक्षक मंडळाकडून इंडियन ऑईल अस्थापनेला पाठविण्यात आला होता. परंतु, इंडियन ऑईल कंपनीतील सुरक्षा अधिकारी अजयपाल यादव यांनी मेल करीत वृषाल पाटील हेच रक्षक म्हणून पाहिजेत, अशी मागणी केली. तरीदेखील सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी स्नेहल माटे व अध्यक्ष राजेश आडे यांनी 28 जानेवारी रोजी वृषाल पाटील यांच्या बदली विशाल वाशीकर यांना पाठविले. संबंधित मंडळाच्या अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारचे पत्र न देता परस्पर चालढकल करीत महिन्याचे वेतन अडकवून ठेवले. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे मानसिक त्रास होऊ लागला असल्याचे वृषाल पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, वृषाल पाटीलने न्यायासाठी कामगार सहआयुक्त, पनवेलचे उपविभागीय अधिकारी आदींकडे निवेदन देऊन नोकरी सुरळीत करण्याची मागणी केली आहे. परंतु, अजूनपर्यंत त्यांच्याकडूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वृषाल पाटील हे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.