। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात दिवसेंदिवस रिक्षा चोरीच्या घटनेत वाढ होत होती. दरम्यान, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा नितीन वाघमारे, महेंद्र वायकर व पोशि चंद्रशेखर चौधरी हे गस्त घालत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्या आरोपीशी साम्य असलेला संशयित व्यक्ती त्यांना दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. यावेळी त्याने त्याचे नाव निसार सत्तार खान (36) असे सांगितले. त्याची विचारपुस केली असता त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबुल केले. या आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने 1 वर्षापासून पनवेल शहर, कळंबोली, कामोठे पोलीस ठाण्याच्या परीसरातुन देखील सुमारे 18 ऑटो रिक्षा चोरी केल्याचे कबुल केले. तसेच, या रिक्षा बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणार्या आरोपीला अटक करून 12 लाख 45 हजार रु. किमतीच्या 18 रिक्षा जप्त केल्या आहेत.