अतिक्रमण विभागाचे लागेबांधे
। उरण । वार्ताहर ।
उरण चारफाटा परिसरात बेकायदा फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी चौकांत खाद्यपदार्थ विकणार्या गाड्या दिसतात. त्याकडे सिडकोचे अतिक्रमण अधिकारी आर्थिक लागेबांधे असल्याने कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
उरण चारफाटा येथील मासळी बाजारात व रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे. त्यात बेकायदा फेरीवाल्यांनी या परिस्थितीत आणखी भर घातली आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूंना हातगाड्या, वडापाव विक्रेत्यांच्या गाड्या, बेकायदा टपर्या व दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी वर्षातून एकदा कारवाई होत असल्यामुळे बेकायदा फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
बेकायदा घरगुती गॅस सिलिंडर वापरून वडापाव, चायनीज खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. गदीर्च्या वेळी सिलिंडरचा स्फोट झाल्यास जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.काही महिन्यांपूर्वी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. कारवाई करून पाठ फिरताच पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. सदर फेरीवाल्यांकडून दर महिन्याला वसुली केली जात असल्याची माहिती फेरीवाल्यांनी दिली आहे. यामध्ये सिडको अतिक्रमण अधिकार्यांचे आर्थिक लागेबांधे असल्यानेच ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.