पुरविण्यात येणारी साधने निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
महावितरण विभाग वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. रोहित्रांमध्ये बिघाड, विजेचा लपंडाव, वीज बिलांच्या समस्या, विजेच्या देखभाल दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष अशा अनेक प्रश्नांनी वादाच्या भोवर्यात सापडलेला महावितरण विभाग कर्मचार्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करताना दिसून आला आहे. एकीकडे कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी महावितरणकडून लाखो रुपयांचा खर्च केल्याचे सांगण्यात येत असताना, दुसरीकडे मात्र विद्युत खांबावर चढून काम करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी लागणार्या साधनांची वानवा दिसून आली. त्यामुळे कर्मचार्यांची सुरक्षा पुन्हा एकदा रामभरोसेच असल्याचे दिसून आले आहे. अशातच महावितरणला कधी शहाणपण येणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
रायगड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात महावितरणचे जाळे पसरले आहे. आज प्रत्येकाच्या घरात विजेचा दिवा आहे. त्यामुळे वीज ही काळाची गरज बनू लागली आहे. जिल्ह्यात नियमीत कर्मचारी 550 आहेत. विजेच्या वाढत्या मागणीमुळे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे कंत्राटी स्वरुपात कामगार घेतले जात आहे. एका एजन्सीला काम देऊन त्या एजन्सीद्वारे कामगार नियुक्त केले जात आहे. विद्युत खांब उभे करणे, विद्युत तार जोडणे, अशी अनेक प्रकारची कामे करीत असताना यातील अनेक कर्मचारी वीजसेवा सुरळीत करण्यासाठी विद्युत खांबावर चढतात. नियमित कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी महावितरण कंपनीकडून सुमारे 45 लाख रुपयांचा खर्च केला जातो. त्यामध्ये झुळा, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, शिडी, हॅन्डग्लोज अशी अनेक साधने पुरविली जातात. तर, कंत्राटी कर्मचार्यांच्या सुरक्षेची जबाबदारी एजन्सीची असते. त्यासाठी प्रशासकीय चार्ज म्हणून सुमारे दहा टक्के निधी वितरीत केला जातो, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
महावितरण कंपनीकडून कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु, आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये महावितरण कंपनीचे काम करीत असताना त्यांच्याकडे यातील काही साधने उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. खर्च करून मिळविलेली सुरक्षित साधने नक्की कुठे असतात, असा प्रश्न जनमानसात उमटत आहे.
विजेचा शॉक लागून यापूर्वी अनेक कर्मचारी मयत झाले आहेत. यातील काही कर्मचारी कंत्राटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सुरक्षित साधनांमध्ये हॅन्डग्लोज हे एक साधन आहे. मात्र, ते हाताळताना त्रासदायक आहे. या हॅन्डग्लोजमुळे पक्कडही व्यवस्थित पकडता येत नाही. विद्युत ताराही धरता येत नाही.
– कर्मचारी (नाव न सांगण्याच्या अटीवरून)
कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 45 लाख रुपयांचा निधी खर्च केला जातो. हॅन्डग्लोज, स्क्रू ड्रायव्हर व इतर सुरक्षित साधने कर्मचार्यांसाठी दिली जातात. तसेच, कंत्राटी कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठीदेखील एजन्सीकडे निधी वितरीत केला जातो.
– माने, अधीक्षक अभियंता