दोन जण गंभीर
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील मस्जिद बंदर परिसरातील एका 11 मजली उंच इमारतीला भीषण आग लागली. या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील मस्जिद बंदर येथील इस्साजी स्ट्रीट, 41/43, पान अली मॅन्शन येथे असलेल्या 11 मजली उंच इमारतीत ही आग लागली. ही आग सुरुवातीला इमारतीच्या तळमजल्यावरील जनरल मीटर बॉक्स आणि इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये लागली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील कॉमन पॅसेजमधील दोन महिलांच्या हात आणि पायांना गंभीर दुखापत झाली. तर धुरामुळे साबीला खातून शेख (42) आणि साजीया आलम शेख (30) या महिलांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेला एक व्यक्ती आणि आठव्या मजल्यावरील एका महिलेला या घटनेत गुदमरल्याचा त्रासाला सामोरे जावे लागले. त्यांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नांनंतर सकाळी 6.30 वाजता आग विझविण्यात आली.