। ठाणे । प्रतिनिधी ।
घराकडे पायी चालत जाणार्या 23 वर्षीय पीडित तरुणीची एका रिक्षा चालकाने भररस्त्यात अडवून छेड काढल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. साहील पठाण (20) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी भिवंडी शहरातील असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. पीडित तरुणी कंपनीमधील काम आटपून गुरूवारी (दि.13) रात्री 8 वाजताच्या सुमारास शहरातील नुरी मस्जिदजवळून जात होती. त्यावेळी आरोपी साहिलने पीडितेला भर रस्त्यात अडवले. त्यामुळे त्याचा जाब पीडितेने रिक्षा चालकाला विचारून ती घरच्या दिशेने जात होती. यावेळी पीडिता घराजवळ पोहोचल्यानंतर रिक्षा चालकाने पुन्हा तिची छेड काढली. हा प्रकार पीडित तरुणीच्या वडिलांना दिसल्याने त्यांनीही रिक्षा चालकाला जाब विचारला. या गोष्टीचा राग येऊन त्याने पीडितेच्या वडिलांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तिथे असलेल्या पाण्याच्या मोटारवर ठेवलेला लोखंडी पत्र्याचा तुकडा उचलून वडिलांवर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. तसेच, तुम्हाला बघून घेतो अशी धमकीही त्याने दिली.
याप्रकरणी पीडितेने शुक्रवारी (दि.14) भिवंडी शहर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर देसाई करत आहेत.