। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील राज्य शासनाच्या महसूल, पाटबंधारे,पंचायत समिती, वृध्द कलावंत आणि दुय्यम निबंधक कार्यालयांच्या संबंधित प्रश्नांवर कर्जत येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे. पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी कर्जत येथील प्रशासकीय भवन येथे उपोषण सुरू केले आहे. कदम यांचे संबंधित विषयावरील तिसरे उपोषण असून शासनाने सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
कर्जत तालुक्यातील जुन्या तहसील कार्यालयाच्या टेकडीवरील इमारतीमध्ये असलेली काही कार्यालये त्याचबरोबर रेकॉर्ड रूम देखील नवीन प्रशासकीय भवन येथे हलविण्यात आलेले नाही. त्याचा परिणाम जूने दस्त कागदपत्र शोधण्यासाठी धावपळ होत असते. वृद्ध सहाय्यक कलाकार मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र, त्यांना लाभ मिळाला नाही. त्या सर्व वंचित लाभार्थ्यांना अर्ज दाखल केल्यापासुन आज पर्यंतचा लाभ तात्काळ मिळावा. या मागण्यांसह पाटबंधारे विभागातील उल्हास, पेज, चिल्लार, पाताळगंगा तसेच नाले आणि कालव्यामधील अतिक्रमणे याबद्दल कार्यवाही व्हावी, अशा अनेक मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांना पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. उपोषणात कोणताही सकारात्मक निर्णय शासनाने घेतला नाही तर आपण आत्मत्याग आंदोलन करू, असा इशारादेखील कदम यांनी दिला आहे.