कोंडीवडे रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कर्जत कोंडीवडे राज्यमार्ग रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे भरून व्यवस्थित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपअध्यक्ष रमेश कदम यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांना खड्डे भरले जातील असे लेखी आश्वासन दिले होते. कर्जत तालुक्यातील कुठेही रस्त्यावरील खड्डे न भरण्यात आल्यामुळे पोलीस मित्र संघटनेने उपोषणाला सुरुवात केली होती. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नसल्याने पोलीस मित्र संघटनेने गतवर्षी दोनवेळा उपोषण केले होते. त्यावेळी लेखी निवेदन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणत्याही प्रकारची कामे केली नव्हती आणि त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश कदम यांनी उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवांग यांनी उपोषणस्थळी भेट देऊन खड्डे भरण्याची कामे तात्काळ सुरु करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्या उपोषणाला यश आले असून, कर्जत कोंडीवडे रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण येथे 15 दिवसात म्हणजे 21 जानेवारी रोजी सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी या पत्राच्या आधारे उपोषण स्थगित केले असून, खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.






