आरसीएफतर्फे पोलीस आरोग्य शिबिर

। अलिबाग । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड थळ आयोजित रायगड पोलीस आरोग्य शिबिराचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय मोहिते यांच्या शुभहस्ते आणि अनिरुद्ध खाडिलकर कार्यकारी संचालक (थळ) आरसीएफ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.2) अलिबाग येथे जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आले.पोलीस अधीक्षक रायगड यांच्या सुचनेवरून पोलीस उप अधीक्षक (गृह) मुख्यालय अलिबाग यांनी केलेल्या विनंतीनुसार अलिबाग उप विभागातील मांडवा सागरी, रेवदंडा आणि मुरुड ठाण्यातील 40 वर्षे वयावरील अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरसीएफ तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक (निगमित संचार व निगमित सामाजिक दायित्व) प्रमोद देशमुख यांनी सांगितले.

सुमारे 200 स्त्री, पुरुष पोलीस कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येईल. यामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा, बीएमआय, सीबीसी/एचबीए 1सी, लिपिड प्रोफाईल आणि नेत्रचिकित्सा या तपासण्यांचा समावेश आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र तत्पर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या स्वास्थ्याची काळजी घेत कृतज्ञता व्यक्त करावी या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरसीएफ थळतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

उद्घाटन समयी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, आरसीएफचे मानव संपदा व प्रशासन मुख्य महा व्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, अतिरिक्त कार्य. उप विभागीय पोलीस अधिकारी जगदीश काकडे यांसह आरसीएफ व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version