। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, तहसील कार्यालय अलिबाग, द लाइफ फाउंडेशन मुंबई, माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर-वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी कातकरी उत्थान अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य शिबीराच्या सुरुवातीला डॉ.राजाराम हुलवान यांनी आदिवासी बांधवांना आरोग्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी किहीम ग्रा.प.सरपंच सीमा थळे, ग्रा.प.सदस्य प्रसाद गायकवाड, किहीम तलाठी विनोद शिंगाडे, मापगांव तलाठी संतराम हांगे, मंडळ अधिकारी पी.बी मोकल, चोंढी-बामणसुरे पोलीस पाटील प्रिती गायकवाड, किहीम पोलीस पाटील संध्या काठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबीर काळात अलिबाग तहसीलदार मीनल दळवी यांनी उपस्थिती दर्शवत शिबिरार्थीना माझे आरोग्य, माझी जबाबदारी यावर अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी आदिवासी बांधवांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले. सदर शिबिरात सुमारे 77 आदिवासी बांधवांची नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल तपासणी व मार्गदर्शन करत गरजेनुसार औषधे देण्यात आली.