सुरक्षित प्रवासासाठी 30 दुचाकीस्वार तैनात; संवेदनशील ठिकाणी दंगाकाबू पथक
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणरायाचे आगमन सतरा दिवसांमध्ये घरोघरी होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात व रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रायगड पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 तसेच पालीफाटा-खोपोली-वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548(अ) वर गणेशभक्तांच्या वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महामार्गावर तीस दुचाकी पथके असणार आहेत.
कोकणासह रायगड जिल्ह्यात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून दीड दिवसांपासून दहा तसेच एक दिवस मनोभावे पूजा, सेवा भक्तांमार्फत केली जाते. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, बोरीवली, ठाणे तसेच पुणे या भागात असणाऱ्या प्रवाशांसह चाकरमान्यांची कोकणासह रायगड जिल्ह्यात जाण्याची लगबग सुरु झाली आहे. येत्या 14 सप्टेंबरला गणरायाचे आगमन घरोघरी होणार आहे. लाखो गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना या दिवशी होणार आहे. मात्र कोकणात येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तासह वाहतूक पोलीस व होमगार्ड पथक नाक्या नाक्यावर तैनात केले जाणार आहेत.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सुमारे एक हजार 900 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड तसेच एसआरपीएफची एक कंपनी आणि बाहेरील बंदोबस्तातील अधिकारी-अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र अंमलदार तैनात केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या 36, मोहल्ला कमिटीच्या 30 आणि गणेश मंडळांच्या 127 बैठका घेण्यात आल्या आहेत. 125 गावांना भेटी देऊन मंडळे आणि नागरिकांना सूचना केल्या आहेत. संवेदनशील ठिकाणी दंगाकाबू पथक व रूट मार्चचेही नियोजन करण्यात आले आहे.
गणेगणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून विशेष मोटारसायकल पथके तयार करण्यात आली आहेत. महामार्गावर दर दहा किलोमीटर अंतरासाठी दोन अंमलदारांसह एक मोटारसायकल गस्तीवर राहणार आहे. एकूण 30 मोटारसायकली तैनात करण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी किंवा अपघाताची घटना घडल्यास ही पथके तातडीने घटनास्थळी पोहचणार आहेत. वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
दहा सुविधा केंद्र उभारणार
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून खारपाडा ते कशेडी या मुंबई-गोवा महामार्गावर 10 सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे ही केंद्रे सुरू राहणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांना मोफत चहा, बिस्कीट, पाणी, सरबत आणि ओआरएस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी या सुविधा केंद्राद्वारे घेतली जाणार आहे. प्रत्येक सुविधा केंद्रावर वैद्यकीय कक्ष, आपत्कालीन उपचार व्यवस्था व रुग्णवाहिका, पोलीस मदत कक्ष, वाहन दुरुस्ती केंद्र, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा, बालकांसाठी आहार कक्ष आणि महिलांसाठी हिरकणी अथवा बालक आहार कक्ष अशा सुविधा उपलब्ध असतील. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची माहिती देणारी फोटो गॅलरीही या केंद्रांवर उभारण्यात येणार आहे.





