नववर्षाच्या स्वागताला पोलिसांचा जागता पहारा

| पनवेल । वार्ताहर ।
नवीन वर्षाच्या आगमनास काही तास बाकी असून 31 ला शनिवार आणि 1 जानेवारीला सुट्टी असल्याने मनसोक्त आनंदाचे उधाण येण्याची शक्यता पाहता पोलीस बंदोबस्तात नेहमीपेक्षा वाढ करण्यात येत आहे. खास करून पनेवल परिसरातील गावा दरम्यान शेत घरे, डोंगरावरील जागा, जंगल परिसर आणि धरण परिसरातील गारव्यात मद्य पार्ट्या होण्याच्या शक्यतेने त्या वाटेवरही पोलीस बंदोबस्त शनिवारपासून लावण्यात येणार आहे.

दोन वर्षांचा करोना कालावधी सरला त्यानंतरही आलेल्या नव वर्षाला काहीशी बंधने होती. यंदा मात्र बंधनमुक्त थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी सर्वच स्तरातील नागरिकत उत्साह वाहत आहे. मोठ मोठी हॉटेल्स ते साधी हॉटेल्स , पब, बार, रिसोर्ट जवळपास सर्वच बुक झालेले आहे. अशा वेळी चायनीज आणि नीचे धरती उपर आकाश अशा पद्धतीचाही आनंद लुटण्याचे मनसुबे रचली जात आहेत. पनवेल परिसरात नीरा, मालडूंगे, क्रोपोली, गाढेश्‍वर आणि थोडे पुढे गेल्यास मोरबे धरण आहे. सध्या त्या मानाने गारवा असल्याने या परिसरातील बोचर्या थंडीत चिअर्स करीत नववर्षाचे स्वागत केले जाऊ शकते मात्र उघड्यावर मद्य पिण्यास मनाई असल्याने पोलिसांचे अशा पार्टीवर नजर ठेवणे आव्हान ठरणार आहे. या शिवाय या पूर्ण परिसरात खारघर हिल सह पनवेल उरण रस्ता नेरळ, रसायनी सुकापूर या मार्गावर जंगलप्रमाणे झाडी असल्याने अशा ठिकाणीही पार्ट्यावर पोलिसांना लक्ष ठेवावे लागणार आहे. मद्याचा अंमल झाल्या नंतर अघटीत काही होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

कोपर्ली, चिरनेर, दिघोडे, पेशवी, सुकापूर परिसरात सलमान खान सह अनेक बडी आसामी तसेच राजकीय पुढार्यांची शेतघरे आहेत या व्हीआयपी ठिकाणी होणारी गर्दी पाहता पोलिसांचे विशेष लक्ष व बंदोबस्त आहे. यासाठी शेतघरे मालकांची बैठक बुधावारी घेण्यात आली होती मात्र त्यात एकही शेतघर असलेला एकही सेलेब्रेटी वा राजकीय नेत्याने उपस्थिती लावली नाही. गेल्या काही वर्षापासून हेराँईन, एम डी, आदी अंमली पदार्थाच्या अनेक कारवाई परिसरात झाल्या असल्या तरी हे पदार्थ या ठिकाणी सापडले म्हणजे त्याचे ग्राहक असणार. तसेच अशा प्रसंगी रेव्ह पार्ट्याची शक्यता ग्रहीत धरता अंमली पदार्थ प्रकरणी मदत करणार्‍या खबर्‍यांना सतर्क करण्यात आले आहे.

Exit mobile version