कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

उरणमध्ये पोलीस-वकील संघर्ष शिगेला

| उरण | प्रतिनिधी |

उरण पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित गैरवर्तणुकीच्या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आणि वकील संघटना यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. अशिलाच्या तक्रारीसंदर्भात पोलीस ठाण्यात गेलेल्या एका वकिलाला पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की करत शर्टची कॉलर पकडली आणि मारहाणीची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने नवे वळण घेतले असून, उरण बार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. गोविंदा नरेश घरत हे आपल्या अशिलासह तक्रार नोंदविण्यासाठी उरण पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार नोंदवून घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचा आणि पोलीस उपनिरीक्षक निलेश विठ्ठल कोडाळकर यांच्यात वाद झाला. तक्रारदाराची बाजू सविस्तर नोंदवून घेण्याची मागणी केल्यानंतर वातावरण तापल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर धक्काबुक्की, अरेरावीची भाषा आणि धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये झाल्याचा दावा करण्यात आला असून, संबंधित व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात रंगू लागली आहे. न्यायासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या वकिलालाच जर अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल? असा सवाल आता विविध स्तरांतून उपस्थित केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उरण बार असोसिएशनने संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

Exit mobile version