अवैध कामे होण्याची शक्यता; वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज
। पेण । प्रतिनिधी ।
पोलीस कर्मचारी अपाल्या खासगी वाहनांवर सर्रास पोलीस असे लिहितात किंवा पोलिसांचा लोगो असलेले स्टिकर लावतात. अनेकदा पोलिसांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाइकांकडून पोलीस या नावाचा गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. पोलीस पाटी लावून खासगी वाहन चालवित असल्याबाबत उच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने सर्वसामन्यांतून नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.
रायगड जिल्हातील अनेक पोलिसांनी त्यांच्या खासगी वाहनांवर पोलीस पाटी किंवा स्टिकर लावलेले आहेत. परंतु, ते वाहन पोलीस ठाण्यात नेले जात नाही. तसेच, ज्यांचे पत्रकारीताशी काहीच घेणे-देणे नाही अशांनी देखील वाहतूक पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आपल्या वाहनांवर प्रेस असे लिहून ठेवले आहे. तर, सरकारी कर्मचार्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी देखील आपल्या खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन म्हणून लिहिलेले सर्रास आढळते. सध्या निवडनुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. याच धामधुमीत राजकीय मंडळींनी दुर्दैवाने जर वाहनांवर अशा पाटी लावून त्या वाहनांमधून अवैधरित्या पैसे आणले तर त्याला जबाबदार कोण असेल, म्हणून तातडीने पोलीस अशी पाटी लावलेल्या गाड्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
तसेच, डॉक्टर, पत्रकार, पोलिस, महाराष्ट्र शासन, फौजी नावाचा व लोगोचा गैरवापर करणार्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच, संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. असे असून देखील रायगड जिल्ह्यात पोलीस नाव किंवा लोगो असलेली वाहने सर्रास दिसत आहेत. अशा वाहनांमार्फत घातपात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. परंतु, यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच, अशी वाहने नाकाबंदी व सुरक्षा तपासणी न करताच सोडण्यात येतात. रायगडच्या जिल्हा वाहतूक पोलिसांनी बुलेटच्या सायलेन्सरवर, अवजड अवैध वाहतुकीवर जशी कारवाई केली, तशी कारवाई अशा प्रकारे लोगो लावणार्यांवर करण्याची गरज असल्याचे सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे.
अवैध पाट्यांवर कारवाई नाहीच
पोलिस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या खासगी वाहनांवर पोलीस पाटी किंवा पोलिसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून टाकण्याचे आदेश पोलिस अधीक्षक देऊ शकतात. परंतु, असे अधीक्षक का करत नाही हा संशोधनाचा विषय आहे. गेल्याच महिन्यात समाज माध्यमांवर पोलीस पाटी लावलेल्या गाडीच्या आडून काही तरुण कशाप्रकारे आरेरावी करतात हे सर्वांनीच पाहिलेले आहे. असे होऊन देखील अशा अवैध पाट्यांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.