| रायगड जिल्हा । प्रतिनिधी ।
तक्रारदार यांच्या मुलीस आरोपी न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या विरुद्ध असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी लाच घेणारे दोन पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना वडाळा टी.टी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांना रंगेहाथ पकडण्यात आले. मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शुक्रवारी केली.
मिळलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सरोदे असे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव असून, राहूल वाघमोडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. हे दोघेही मुंबईतील वडाळा टी. टी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे एका व्यक्ती बरोबर त्यांच्या समाजाच्या हॉलबाबत वाद आहेत. 7 सप्टेंबरला तक्रारदार व त्यांचे विरुद्ध गटामध्ये पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटाचे लोक वडाळा टी. टी पोलीस ठाणे येथे जमा झाले. त्यावेळी विरुद्ध गटाच्या तक्रारीवरून तक्रारदार यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या मुलीस आरोपी न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या विरुद्ध असलेल्या गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आरोपी राहूल वाघमोडे यांनी त्यांच्या स्वतःसाठी 50 हजार रुपये आणि वरिष्ठ अधिकारी सरोदे यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच लाख रुपयांचा सौदा चार लाखापर्यंत करण्यात आला. अखेर तक्रा दाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सापळा रचण्यात आला. अखेर लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन थोरात करीत आहेत.







