पोलीस पाटलांच्या समस्या दूर करणार

तहसीलदार आयुब तांबोळींची ग्वाही
चौक | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील गाव पोलीस पाटील यांच्या मुदतवाढ, वेतन व रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद खालापूरचे नवनिर्वाचित तहसीलदार आयुब तांबोळी यांनी दिल्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी सांगितले.
खालापूर तहसीलदार म्हणून नवनिर्वाचित तहसीलदार आयुब तांबोळी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत व गाव पोलीस पाटील यांच्या समस्यांबाबत खालापूर तालुका पोलीस पाटील संघटनेने त्यांची भेट घेऊन स्वागत केले व आपल्या मागण्या सविस्तरपणे सांगितल्या. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी लागलीच या संदर्भात मंडळ अधिकारी यांना पत्र देऊन अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. तालुक्यातील 157 महसुली गावात 135 गाव पोलीस पाटील पदे मंजूर असून, 92 गाव पोलीस पाटील कार्यरत आहेत, तर 43 पदे रिक्त आहेत. कोरोना च्या काळात गाव पोलीस पाटील यांनी महसूल विभाग व पोलीस खाते यांच्याबरोबर जीवाचे रान करून काम केले आहे.
रिक्त पदांबाबत कार्यवाही सुरू करून गाव पोलीस पाटील हा समाजातील व शासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे, तुम्ही प्रशासनाला चांगले सहकार्य करा, तुमच्या समस्या योग्य त्याठिकाणी पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन तहसीलदार यांनी दिल्याचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी सांगितले. यावेळी दिनेश पाटील, महेश जांभळे, वासुदेव देशमुख, जयेंद्र पाटील उपस्थित होते.

Exit mobile version